जेजुरी गड आणि कडेपठार या शृंखलेतील मागील भागात आपण खंडोबाचे मंदिर ते कडेपठार या मार्गाबद्दल माहिती पाहिली. अर्थातच ती रोमांचक होतीच पण या पुढचा जो आमचा प्रवास घडला, जी यात्रा घडली आणि जे काही अनुभव आले ते आणखीन रोमांचक आहेत. कारण आतापर्यंत मी फक्त प्रवास, भौतिक वस्तू आणि त्यांच्याबद्दल माझे अध्यात्मिक आणि इतर विचार व्यक्त केले आहेत. पण या शृंखलेतील शेवटच्या भागात मी मला जाणवलेल्या काही शब्दांच्या पलीकडील अनुभवांबद्दल, जाणिवांबद्दल सांगणार आहे.

कडेपठाराची कमान ओलांडपवार प्रथम दृष्टीस पडते ते म्हणजे साक्षी गणपतीचे मंदिर! अर्थातच सुरुवात म्हणजे गणपती आलाच. मंदिर छोटेसे आहे. आम्ही गेलो तेव्हा दार बंद होते त्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. पण त्या दर्शनात सुद्धा का माहिती नाही पण वेगळी जाणीव झाली. सहसा गणपतीच्या मंदिरात अशी गंभीर लहरींनी युक्त जाणीव होत नाही, वातावरण जड झाल्यासारखे वाटत नाही. पण इथे मात्र तसे निश्चित वाटले. गणेशाची ही मूर्ती मला काहीशी उग्र वाटली. गणेशाचे हे रूप पाहून सगळीकडे प्रस्थापित नजरेने बघणाऱ्या मनाला लागलीच ताळेवर यावे लागले. गणपती हा गणांचा अधिपती आहे आणि हे गण म्हणजे कोणी नुसते गोंडस बाहुले नव्हत. त्यामुळे त्यांचा अधिपती सुद्धा कायम गोंडस रूप घेऊन बसेल ही अपेक्षाच मुळी चुकीची. त्या दिवशी प्रथमच हा साक्षात्कार झाला. आणि मी समजून चुकलो या जागेतील शक्तींना आणि लहरींना कमी लेखणं म्हणजे मोठी चूक असेल!


गणेशाचे दर्शन घेतल्यावर जणू काही रिकामे भांडे असावे तसे मन घेऊन पुढे जाऊ लागलो. कुठल्याच गोष्टीबद्दल पूर्वग्रह माझ्या अनुभवसाधनेला बाधा आणणारे ठरणार होते. पायवाटेने कडेपठार खंडोबाच्या मंदिराच्या दिशेने जाऊ लागलो. खंडोबाचे मंदिर (सिंहासन) यायच्या आधी इतर मंदिरे लागली. मी आणि बाबांनी ठरवलं होतं की या मंदिरांमध्ये आधी जाऊ दर्शन घेऊ आणि अखेर खंडोबाचे दर्शन घेऊ.
जेजुरी कडेपठाराचा नकाशा खाली देत आहे. आश्चर्य म्हणजे गुगल कडे वीरभद्र आणि नागेश्वर यांच्या मंदिरांचा उल्लेख नाही. मी देणार आहे गुगल कडे (बघू कधी दाखवतात नकाशावर!)

श्री साक्षी गणपती पासून पुढे गेल्यावर एक अकल्पित गोष्ट घडली. नकाशावर पाहा.. वीरभद्र मंदिर! चालत चालत अचानक समोर आले वीरभद्र मंदिर. खांब, भिंती, गोपुर, स्तंभ इत्यादी काहीही नसलेले मंदिर. शेंदूर लावलेली पाषाण मूर्ती, कडेला छोटा चौथरा, वर घनगर्द मेघांनी व्यापलेलं आभाळ, एका बाजूला फडफडणारा पिवळा ध्वज आणि मागच्या बाजूला दरी. क्षणभर बघत राहिलो. आपण नक्की काय बघत आहोत याचे विश्लेषण करत होतो. या मंदिराकडे जाणारी वाट म्हणजे रस्त्याला फुटणार एक फाटा आहे. सर्वार्थाने वाट मोडून जावं लागतं. जायचं की नाही हे ज्याने त्याने ठरवायचं. अर्थातच मी पुढे गेलो.

या जागेबद्दल शब्दात सांगणे थोडे कठीण आहे पण प्रयत्न करतो. हे मंदिर समोरून बघितल्यापासून मनाचा ठाव घेतल्यासारखं झालं. वातावरण आणखीन गंभीर होत गेलं. जाणिवांचं जडत्व मनाला जाणवत होतं पण पाय आपसूक पुढे जायला बाघाय असल्यासारखे पुढे जात होते. पावलागणिक हे गांभीर्य वाढत होते. जणू मनातच आभाळ दाटत होतं. पण एक गोष्ट निश्चित की गांभीर्य असलं तरीही ते दडपण आणणारं नव्हतं. किमान मला तरी दडपण नाही आलं. हे निश्चित जाणवत होतं की एक असीमित शक्ती आपल्या आजूबाजूला आहे आणि आपण या शक्तीच्या अधीन असलेला एक यत्किंचित सजीव. जसजसा जवळ गेलो तसतसा शक्तीच्या जवळ जात होतो. सगळ्या प्रकारचं मोठेपण अंगातून निघून जात असल्याचा भास झाला. काही क्षणातच मी हात जोडून वीरभद्रासमोर उभा होतो.


सारं काही अंगावर येणारं होतं. मी पानाची जाणीव होण्याला आणि अहंतेला शून्य वाव होता. लौकिकाला साजेसे रूप होते वीरभद्राचे. काही क्षण नुसता बघतच राहिलो. या अचाट शक्तीपुढे नतमस्तक झालो. याठिकाणी एक पाटी लिहिलेली आहे. “महिलांनी लांबून दर्शन घ्यावे”

इथे एक गोष्ट सांगणं अत्यंत गरजेचं आहे की आपली मंदिरे केवळ मंदिरे नसून ती ऊर्जाक्षेत्र देखील असतात. प्रत्येक ऊर्जा, प्रत्येक शक्ती ही प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. आणि हे मी केवळ लोक सांगतात आणि ग्रंथामध्ये सांगितले आहे म्हणून सांगत नाहीये. माझ्या अनुभवांच्या जोरावर मी हे सांगतोय की वीरभद्र मंदिराच्या परिसरातील शक्ती गडद आहे, अघोरी आहे आणि भारावून टाकणारी आहे जी केवळ महिलाच काय पण, कमकुवत पुरुषांना देखील मानवणारी नाही. बाकी ज्याचा त्याचा विचार!


वीरभद्राचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आधी साक्षी गणेश आणि आता वीरभद्र! जेजुरी कडेपठार एक प्रचंड प्रवाही शक्तीक्षेत्र आहे यावर माझा विश्वास बसला!
पुढे चालत गेलो. मनाला वातावरणातला जडपणा जाणवत होताच. वाटेत एक आडोसा येतो. भाविकांना बसण्यासाठी सावलीची जागा आहे. काही क्षण तिथे विसावा घेतला. एखाद्या गंभीर कथेत थोडा विसावा यावा तसे पिलू दिसले. तिथेच एक काका देखील होते. काही क्षण सामान्य गेले!

या ठिकाणावरून थोडे पुढे जाताच, आणखीन एक चंद्रमौळी मंदिर दिसले! नागेश्वर.. या एकाच पठारावर नक्की किती मंदिरे आहेत याचा विचार करत मी जवळ गेलो.


नागेश्वराचे दर्शन घेतले आणि उजवीकडे वळलो तर आधी मारुतीरायाचे मंदिर आणि त्याच्या पुढे श्रीरामाचे मंदिर! माझा अनुभव असा होता की या दोन मंदिरापाशी मला मनाचे जडपण जाणवले नाही. उलट थोडे हलके वाटले


आता श्रीरामाँचे दर्शन घेऊन थेट खंडोबाचे दर्शन घ्यावे हा विचार मनात आला आणि दूरवर आणखीन एक मंदिर दिसले. ते मंदिर नक्की कशाचे होते हे तेव्हा माहिती नव्हते. मुळातच जेजुरी कडेपठारावरील मंदिरांबद्दल फारसं कुठे सांगितलं जात नाही त्यामुळे आम्हालाही महीहीती नव्हती. पुन्हा एकदा आम्ही वाट मोडली आणि त्या मंदिराच्या दिशेने जाऊ लागलो. खंडोबाचे दर्शन सगळ्यात शेवटी घ्यायचे हाच माझा मानस होता.
हळूहळू जवळ जात गेलो तेव्हा समजले की हे एक शंकराचे मंदिर आहे. पंचलिंग शिवालय!

या मंदिराच्या बाहेरून जाणवणारी ऊर्जा आणि आतून जाणवणारी ऊर्जा यात फारच तफावत होती. एकूणच हे मंदिर फार काही नेटकं ठेवलेलं दिसत नव्हतं. कोणालाही कसेही गर्भगृहात शिवलिंगाजवळ यायची मुभा दिसत होती. शंकराची पिंड निश्चितच वेगळी होती. अर्थातच पंचलिंग. गाभाऱ्यातील दगडी भिंत, त्याला फासलेला निळा रंग, सर्वत्र उधळलेला भंडारा आणि वरून सोडलेला एक विवक्षित दिवा. पिंजऱ्यातील गणपती! मोठं चमत्कारिक वाटलं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर एका असीमित ऊर्जेशी केलेले हे अज्ञानी खेळ, छेडखानी वाटत होती. भोळ्या शंकराची शांत गंभीर ऊर्जा इथे मंदिरात कुठेतरी अधांतरी होऊन भिरभिरत आहेत असं वाटून गेलं. आम्ही आपले दर्शन घेऊन बाहेर पडलो. सगळं अंगावर येणारं होतं सगळं!



दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि सरळ खंडोबाच्या मंदिराकडे जाऊ लागलो. दुपार होत चालली होती, थोडी भूकही लागली होती. पण दर्शन घेऊनच खायला येऊ असं आम्ही दोघांनी ठरवलं.
खंडोबाच्या मंदिराकडे जाताना आधी वाघजाई चे मंदिर लागले. मंदिराच्या समोर काही मुकुटासमान शिल्प होती. ज्यांचा अर्थ अजून मला फारसा उमगलेला नाही. एकंदरीत पाहून मी दुरूनच नमस्कार केला कारण अशा परिस्थितीत पुढे जावे की नाही याबद्दल खात्री नव्हती. आता असं वाटतं की पुढे गेलो असतो तरीही चाललं असतं.

पुढे जाऊ लागलो तेव्हा काही शिल्पे दिसली. वेगळी होती! त्यांच्याबद्दल माझे कयास आहेत पण कुणाला काही वेगळे माहिती असल्यास नक्की सांगा. आमच्या ज्ञानात भर पडेल.
खंडोबाच्या सिंहासन मंदिराजवळ जाताना मंदिराच्या बाजूने गोमुख दिसले आणि त्याच्या बाजूला एका पारावर पूर्वीच्या काळी कधीतरी नवस पूर्ण झाला म्हणून देवाला कोणीतरी सपत्नीक पूजा केल्याचे शिल्प दिसले. पूर्वीच्या काळी कोणी मोठी व्यक्ती या पूजेची आठवण म्हणून असे शिल्प बनवून घेत असत. आपल्याकडील अनेक मंदिरात राजा आणि राणी एकत्र पूजेला बसले आहेत अशी शिल्पे आढळतात.



खंडोबाच्या मंदिराच्या समोर दोन नंदी आणि त्यांच्याबरोबर मारुती ची वेगवेगळ्या रूपातील शिल्पे दिसली. मारुतीराय शंकराचा रुद्रावतार असल्याने त्याबद्दल मला फार आश्चर्य वाटले नाही.






सगळं वातावरण कुंद झालेलं होतं. अगदी हलका पाऊस पडू लागला होता. खंडोबाचे मंदिर आणि मनीचे भाव हा फार वेगळाच पण चांगला अनुभव होता. अशा ठिकाणी आणि अशा वातावरणात मनातील सगळे उथळ विचार दूर निघून जातात आणि एकाच गोष्टीने मन व्यापले जाते “भक्ती”
खंडोबाचे दर्शन घेतल्यावर मंदिराच्या चहूबाजूंनी दर्शन घेतले. त्यात अश्वारूढ खंडोबा आणि श्वान यांची शिल्पे दिसली


यापुढे मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि मणीदाराचे काही भाग टिपले.





यानंतर आम्ही दोघे काही काळ जवळच्या बाकावर बसलो. सगळे वातावरण आपल्यात सामावून घेण्याचा आणि आपण स्वतः त्या वातावरणात मिसळून जाण्याचा प्रयत्न केला. किती वेळ गेला समजले नाही पण अखेर आम्ही तिथून निघालो तेव्हा माध्यान्ह उलटून बराच वेळ गेलेला होता. आधी ठरवल्याप्रमाणे तिथल्याच एका हॉटेलात डोसा खाल्ला आणि कडेपठारावरून खाली उतरण्याची सुरुवात केली.

क्षुधाशांती झाल्यावर आम्ही गाद उतरू लागलो. प्रत्येक पावलाने गड मागे पडत होता.
या गडावरील अनुभव आणि अनुभूती विसरण्याजोग्या नाहीत हेच खरं.. ही यात्रा वरचेवर होत राहो हीच प्रार्थना.. खंडोबाच्या नावानं चांग भलं!! यळकोट यळकोट जय मल्हार!!
आधीचे ब्लॉग इथे वाचा